इस्लामपूरमध्ये जुन्या नोटांचं घबाड, तिघांना अटक

इस्लामपुर : पोलीसनामा ऑनलाईन – सांगलीच्या इस्लामपूरमध्ये तब्बल एक कोटीच्या जून्या नोटांचं घबाड घेऊन आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक कोटी किंमतीच्या ५०० रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर या नोटा सापडल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहिर केल्यानंतर चलनातून १ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर नोटा बदलून घेण्याचा कालावधीही उलटून गेला आहे. दरम्यान शहरात काही जण जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी येणार असल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एसटी स्टॅंड जवळ सापळा रचून ही कारवाई केली. नोटा घेऊन आलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ताब्यात घेतलेले तिघेही वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रग़ड येथील राहणारे आहेत. ते जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आले होते. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ९९ लाख ९७ हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी एवढ्या मोठ्या नोटा कुठून आल्या? ते कोणाला नोटा देणार होते याचा तपास पोलीस करत आहेत.