नशिब फळफळले, एक कोटींचे बक्षीस लागले, पण…

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन 

दैव देते आणि कर्म नेते अशी आपल्याकडे म्हण आहे. पण नाला सोपारा येथील एका टेम्पोचालकाला दैवाने तब्बल एक कोटी रुपये दिले होते पण, तरीही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे कारण, त्यांनी खरेदी केलेले लॉटरीचे तिकीट बनावट निघाले आहे. कदम यांच्याकडील तिकीटामुळे आणखी एक घोटाळा समोर असला असून लॉटरीच्या तिकीटांचीही बनावट छपाई केली जात असल्याचे उघड झाले आहे. आता ही तिकीटे किती खरी आणि किती बनावट हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुहास कदम असं टेम्पोचालकाचं नाव असून ते नालासोपारा येथे राहतात. कल्याणच्या भाजी बाजारात कदम दररोज टेम्पो घेऊन येतात. आर्थिक चणचण असल्यामुळे नशिब आजमावून पाहण्यासाठी त्यांनी एके दिवशी कल्याणच्या प्रिन्स लॉटरी सेंटरमधून लॉटरीचे तिकीट खरेदी केले.

राज्य सरकारची गुढीपाडवा सोडत असे लिहिलेल्या या तिकिटावर १ कोटी ११ लाख रुपयांचे बक्षीस होतं. लॉटरीला २० मार्च रोजी निकाल लागला. कदम यांनी लॉटरीचा निकाल तपासला असता त्यांना पहिले १ कोटी ११ लाखांचे बक्षीस लागले होते. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

त्यांनी ते तिकीट घेऊन लॉटरीचं दुकान गाठलं असता आधी त्यांना नवी मुंबईला पाठवण्यात आले. मात्र तिथे त्यांच्याकडे असलेले तिकीट बनावट असल्याचे उघड झाले. त्यांनी तेथे अनेकदा विनंत्या केल्या, पण तिकीटच बनावट असल्याने आम्ही काही करु शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. कल्याणला येऊन त्यांनीपुन्हा लॉटरी विक्रेत्याकडे जाऊन जाब विचारला असता त्याने कदम यांना टाळले. त्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी लॉटरी विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या सगळ्या प्रकारामुळे सुहास कदम हवालदिल झाले आहेत.

कदम यांना लागलेल्या बक्षीसामुळे आणखी एक मोठा घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यामागील सुत्रधार कोण हे शोधून काढणे आवश्यक आहे.