झुलन गोस्वामीनं इतिहास घडवला

दुबई : वृत्तसंस्था – भारतीय महिला क्रिकेट संघातील माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारतीय महिला टीमचा २-१ नं विजय झाला.  ही सीरिज जिंकण्यात झुलन गोस्वामीनं महत्त्वाची भूमिका बजावली. या सीरिजमध्ये तिने ८ विकेट घेतल्या.

गेली तब्बल १७ वर्षे भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळणारी झुलन गोस्वामी कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असतानाही संघाच्या विजयासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे.  झुलन गोस्वामीने एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीतले आपले अव्वल स्थान सलग १८७३ व्या दिवशी कायम राखले असून फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृती मंधनाने देखील आपले अव्वल स्थान कायम राखत एकदिवसीय क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम राखला आहे. यापुर्वी २०१२ मध्ये मिताली राज आणि झुलन गोस्वामी क्रमवारीत अव्वल स्थानी होत्या. त्यानंतर प्रथमच भारतीय खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघातील माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने टी-२० क्रिकेट प्रकारातून ऑगस्टमध्ये निवृत्ती घेतली आहे. याआधी फेब्रुवारी २०१७ सालीही झुलन गोस्वामी महिला क्रमवारीत अव्वल स्थानावर होती.