दोन सख्ख्या भावांच्या भांडणात एका भावाचा खून

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती कारणावरून दोन भावांमध्ये झालेल्या हाणामारीत एका भावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर शहरात घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.५) रात्री आठच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. राजेंद्र माळवदकर असे मृत्यू झाल्या भावाचे नाव असून त्याचा सख्खा भाऊ सचिन माळवदकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

पंढरपूरमधील संभाजी चौकात राहणा-या माळवदकर भावांमध्ये घरगुती कारणावरुन भांडण होते. आज रात्री त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. चिडलेल्या सचिनने राजेंद्र याचा गळा आवळला. यामध्ये राजेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार समजताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राजेंद्रचा भाऊ सचिन याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. या घटेनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.