लष्कराच्या वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लष्कराच्या वाहनाने पादचाऱ्याला दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर गंगाधाम चौकात शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाला मार्केटयार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नंदकुमार बबन मोहळ,( वय  ४८, राहणार हमालनगर वसाहत मार्केटयार्ड ) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शिपाई मनोज कुमार ( वय २८, ए एफ एम सी वानवडी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारा एएफएमसीचे लष्करी वाहन बिबवेवाडी कडून वानवाडीकडे जात होते. त्यावेळी नंदकुमार मोहोळ हे गंगाधाम चौकात रस्ता ओलांडत होते. तेव्हा लष्करी वाहनाची जोरदार धडक त्यांना बसली. त्यात वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिक व इतर वाहनचालकांनी मिलिटरी गाडीस थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर चौकातील पोलिसांनी मिलिटरी गाडीसह ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. मयत मोहळ यास दोन मुली, पत्नी भाऊ बहीण असा परिवार आहे. पुढील तपास मार्केटयार्ड पोलीस करीत आहेत.