नाशिक जिल्ह्यात ‘कोरोना’चा ‘पहिला’ बळी, मालेगावात 5 रुग्ण पॉझिटिव्ह

नाशिक, पोलीसनामा ऑनलाईन : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात बुधवारी कोरोना विषाणूने संशयित एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या संशयित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकाच दिवशी मालेगावात 5 रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की ज्या 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तो मालेगावचा रहिवाशी होता. त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. तसेच त्या संशयित रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हा अहवाल प्राप्त झाल्यावर मृत व्यक्तीसह अजून 4 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. बुधवारी सकाळी या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे. दरम्यान मालेगावात 5 रुग्ण आढळल्यानं प्रशासन हादरलं आहे.

मृत झालेला व्यक्ती दोन महिन्यांपूर्वी सौदी अरेबियाला उमरा-हज यात्रेला जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. तर उर्वरित रुग्णांचे कनेक्शन अजून उघड झालेले नाही. सर्व संशयीत रुग्णांना मालेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातील विशेष कोरोना कक्षात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांचे मरकज कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात लॉकडाऊन असूनही दिवसागणिक कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. राज्यात सध्या 1135 कोरोना बाधित रुग्ण आहेत. दरम्यान सर्वात जास्त संख्या ही मुंबईत आहे. शासनाने सांगितले आहे की संपूर्ण राज्यासाठी पुढील 7-8 दिवस अत्यंत महत्त्वाचे असून सगळ्यांनी खबरदारी घ्यावी असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.