दुर्दैवी ! बहिणीचे लग्न अवघ्या 6 दिवसांवर, पत्रिकावाटपास गेलेल्या भावाचा दुर्देवी मृत्यू

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन  –    अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या बहिणीच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटप करण्यास गेलेल्या भावाचा अपघाती मृत्यू झाला. तर दोघे चुलतभाऊ गंभीर जखमी झाले. कोचीनारा (जि. गडचिरोली) येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. बहिणीला बोहल्यावर चढताना पाहण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पवन केजाराम देवांगन (वय 25) असे अपघातात मृत्यू झालेल्या भावाचे नाव आहे. तर प्रमोद करंगसू देवांगन (वय 24) आणि जागेश्‍वर पंचराम देवांगन (वय 19, सर्व रा. कोचीनारा) असे अपघात जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमीवर गडचिरोली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पवनच्या बहिणीचे 14 एप्रिलच्या मुहर्तावर लग्न होते. त्यामुळे घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. बहिणीचे लग्न असल्यामुळे पवन खुश होऊन लग्नाच्या तयारीला लागला होता. तो दोघा चुलतभावांना घेऊन लग्नपत्रिका वाटप करण्यासाठी कोरची येथे दुचाकीवर गेला होता. लग्नपत्रिका वाटप करून घराकडे परतत असताना बेळगाव-झनकारगोंदी फाट्यावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात पवनचा जागीच मृत्यू झाला. तर प्रमोद आणि जागेश्वर हे दोघे गंभीर जखमी झाले.