खाणकाम सुरु असताना कोसळली दरड, एकाचा मृत्यू

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळणे येथे खाणकाम सुरु असताना मोठा अपघात घडल्याची माहिती मिळते आहे. खाणकाम करीत असताना दरड कोसळल्याची माहिती मिळते आहे. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली असून यात मशिन्ससह कामगार ढिगाऱ्याखाली गाडला गेला असून यात त्याचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कळणे येथे खाणकाम काम सुरू असताना दरड कोसळली. यात उत्खनन करणाऱ्या मशीनसह ऑपरेटर गाडला गेला. घटना घडताच तेथे बघ्यांची गर्दी झाली. पण अधुनमधुन माती कोसळत असल्याने बचाव कार्यात अडथळा आला. तरीही तातडीने माती बाजूला करून ऑपरेटरला बाहेर काढण्यात आले. पण तो त्यात मृत झाल्याचे समजते. हा ऑपरेटर परप्रांतिय असल्याचे समजते. मात्र व्यवस्थापकाकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे खनिजाची खाण आहे. गेली काही वर्षे ही खाण वादाच्या भोवऱ्यात आहे. खाण सुरू करण्यास स्थानिकांचा विरोध होता यासाठी करण्यात आलेले आंदोलन राज्यभर गाजले होते.