माकडांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू ; गुन्हा दाखल करण्याची कुटुंबाची मागणी 

तिकरी (उत्तर प्रदेश)  :  वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात चक्क माकडांमुळे एका ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे माकडांनी विटा फेकून मारल्यामुळेच  या व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील तिकरी या गावी बुधवारी (दि.१७) घडली आहे.  सध्या या घटनेची चर्चा सर्वत्र सुरु आहे. धर्मपाल सिंह असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,मृत धर्मपाल विटांच्या ढिगाऱ्याजवळ झोपले होते. त्यावेळी काही माकडांनी विटांवर उड्या घेतल्या. यामुळे विटांचा ढीग कोसळला आणि धर्मपाल यांच्या अंगावर पडल्या. धर्मपाल गंभीर जखमी झाले होते. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

‘ही’ आहेत कालव्यांची परिस्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे : जलतज्ञ प्रदीप पुरंदरे

मात्र, धर्मपाल यांचा भाऊ कृष्णपाल सिंह यांनी पोलिसांकडे तक्रार दिली मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार फेटाळून लावली आहे. कृष्णपाल यांनी दिलेल्या तक्रारीत धर्मपाल घरात पुजेसाठी लाकडं गोळा करत असताना माकडांनी त्यांच्यावर हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. विटांचा मार धर्मपाल यांच्या डोक्यावर आणि छातीवर बसला. यामध्ये ते जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात आले. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असा कृष्णपाल यांचा दावा आहे.

धर्मपाल यांचे भाऊ म्हणाले  की ‘आम्ही पोलिसांकडे माकडांविरोधात लेखी तक्रार दिली आहे. मात्र पोलीस हा अपघात असल्याचं म्हणत आहेत’. तसेच आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.