पुण्याला निघालेल्या जोशी कुटुंबीयांवर काळाचा घाला, अपघातात एकाचा मृत्यू

नागठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – (जि. सातारा) कारचालकाचे वेगावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. पुणे- बंगळूर महामार्गावर बोरगाव (ता. सातारा) येथे मंगळवारी (दि. 22) दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. जखमीना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भुजंगराव दामोदर जोशी (वय 74) असे अपघातातील मृताचे नाव आहे. तर नंदाताई भुजंगराव जोशी (वय 62), अनुराधा प्रशांत घुमे (वय 36), श्रीधर प्रशांत घुमे (वय 19), चालक चिन्मय प्रकाश साधले (वय 24) अशी जखमीचे नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी कुटुंबीय हे कारने (एमएच 04 एचएफ 8077) कर्नाटकातील चिकोडी येथून पुण्याला निघाले होते. दुपारी एकच्या सुमारास बोरगाव हद्दीत आले असताना कारचालकाचे वेगावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. अपघातानंतर कार महामार्गावरच तीन ते चार वेळा उलटली. त्यानंतर मोटार मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली.

अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कार क्रेनच्या साहाय्याने बाजूला केली. बोरगाव पोलिस ठाण्याचे हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम, क-हाड महामार्ग पोलिस मदत केंद्राचे रघुनाथ कळके, राजू बागवान, बशीर मुलाणी, अब्दुल सुतार, सुहेल सुतार यांनी तातडीचे मदत कार्य केले.