‘इंजिनियर’च निघाला सराईत गुन्हेगार, शस्त्रसाठ्यासह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – बिहार, हरियाणा या राज्यांसह विविध जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगारांना एकत्र करून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीचा मास्टर माईंड सिव्हील इंजिनिअर असलेला तरुण निघाला. त्याने पुसदमध्ये आपला अड्डा तयार करून घातक शस्त्रांचा साठा जमा केला. पुसदमध्ये चोरट्यांनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या टोळीचा पर्दाफाश झाला.

अमजद खान सरदार खान (वय-28 रा. पुसद) असे या टोळीच्या मोऱ्हक्याचे नाव असून तो अभियंता आहे. देव ब्रह्मदेव राणा (वय-22 रा. डुबोली ठाणा कापाशेडा जि. रोहतक, हरियाणा), मोहंमद आसीफ मोहंमद कलाम (वय-19 रा. कलासन जि. मधेपुरा, बिहार) या दोघांना पुसद शहरात घरफोडी करण्यासाठी आणले होते. त्यांच्यासोबत मोहंमद अफीस मोहंमद अफजल (वय-27 रा. सुभाषनगर, दिग्रस), सागर रमेश हसनापुरे (वय-22 रा. मंगरुळ दस्तगीर ता. धामणगाव), लखन देविदास राठोड (रा. मोरगव्हाण ता. दारव्हा) यांच्या मदतीने शहरात घरफोडी केल्या. पोलिसांनी अमजद खानसह तिघांना शहरातील एका घरावर छापा टाकून पकडले.

पोलिसांनी त्यांच्याकडून 6 देशी बानावटीचे कट्टे, 118 राऊंड जप्त केले . तर दिग्रस शहरातून मोहंमद आसीफ याच्यासह दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक पिस्टल, तीन काडतुसं, 17 धारदार चाकू, 7 तलवारी असा मुद्देमाल जप्त केला. तसेच या टोळीसोबत काम करणाऱ्या लखन राठोडला पुसदमध्ये अटक करण्यात आली. त्याच्याकडून 22 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या दुचाकीपैकी 12 दुचाकी यवतमाळ तर उर्वरीत दुचाकी वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातून चोरल्याचे कबूल केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून 2017मध्ये केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील 53 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

आरोपीचे आलिशान घर
या टोळीचा मास्टर माईंड अमजद खान याने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तर त्याचा भावाने पॉलिटेक्निक केले आहे. दोघांवर पुसदमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याच्या भावकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोघांनी चोरट्यांची टोळी तयार केली. त्यासाठी बिहार, हरियाणा, पुसद, नांदेड, दिग्रस, दारव्हा याठिकाणच्या सराईत गुन्हेगारांना एकत्र केले. घरफोडी, लुटमारीच्या पैशातून मुख्य आरोपीने शहरात आलिशान घर बनवले आहे. त्याने इतर आरोपींना राहण्यासाठी शहरात भाड्याचे घर घेतले होते.

रेकी करून करत होते गुन्हे
अमजद खान याने घरफोडीचे गुन्हे करण्यासाठी विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना एकत्र करून टोळी बनवली. या टोळीने अनेक गुन्हे केले आहेत. मागील काही दिवसांपासून ही टोळी पुसद शहरात सक्रीय होती. या टोळीने एका पेट्रोल पंपाची आणि एका हॉस्पीटलची रेकी केली होती. पेट्रोल पंपावरून आणि रुग्णालयातून कधी आणि कोणत्या वेळेला कॅश घेऊन जातात याची रेकी केली होती. कॅश घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला करून कॅश लुटण्याच्या तयारी असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. या टोळीने आठ दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये मोठा गुन्हा केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नरूल हसन, पुसदचे सहायक पोलीस अधीक्षक अनुराग जैन, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, श्रीकांत जिंद्दमवार यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/