सीसीटिव्हीमुळे पर्दाफाश ! पुण्यात हाॅटेलचा पत्ता न सांगितल्याने युवकावर गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्यांना प्यासा बार अँड रेस्टॉरंटचा पत्ता नीट न सांगितल्याच्या कारणावरून अहमदनगरहून आलेल्या तिघांनी एका अल्पवयीन मुलावर छऱ्याच्या एअरगनने फायर करून जखमी केले. त्यानंतर त्याला खडकी येथील मरिआई गेटजवळ टाकून त्यांनी पोबारा केला. शुक्रवारी रात्री ११ ते पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी युवकाने आधी घाबरून खरा प्रकार सांगितला नाही. परंतु पोलिसांनी सीसीटिव्ही तपासल्यावर खरा प्रकार उघडकिस आला.

याप्रकऱणी १७ वर्षीय सनी चौधरी (रा. बिबवेवाडी ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत सनीच्या पायात गोळीबार केल्याने त्याच्या पायाला जबर जखम झाली आहे. तर याप्रकऱणी फरासखाना पोलिसांनी अंबादास अशोक होंडे (वय २८, रा. दापोडी, मुळ अहमदनगर) याला अटक केली आहे. तर त्याच्या इतर २ साथीदारांचा शोध सुरु आहे.

असा घडला प्रकार

सनी चौधरी हा शुक्रवारी सायंकाळी एका हॉटेलमध्ये जेवण करून घरी जात होता. त्यावेळी एक पांढऱ्या रंगाची स्काॅर्पिओ कार तेथे आली. त्याच्याजवळ थांबलेल्या स्कॉर्पिओमधील व्यक्तींनी त्याला विचारले की, प्यासा बार कुठे आहे. ते सर्वजण खडकी येथे एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांना बारमध्ये जायचे होते. सनीने सुरुवातीला मला माहित नाही असे उत्तर दिले. परंतु त्यांनी सनीला दमबाजी केली तेव्हा तो हॉटेल दाखविण्यास तयार झाला. त्यानंतर त्याला गाडीत बसवून सर्व प्यासा हॉटेलजवळ आले. त्यानंतर तेथे आल्यावर त्यांनी सनीला पैसे दिले. तो बारमधून दारू घेऊन आला. त्यांनी गाडीतच दारू प्यायली. मग सनीला डेक्कनला सोडतो म्हणून ते त्याला गाडीत बसवून घेऊन गेले. परंतु ते डेक्कनहून पुढे निघाले. गाडीत बसलेले असताना त्यांनी सनीला तू आधी बार का दाखविला नाही. असे म्हणून मारहाण केली. त्यानंतर त्याला शिवीगाळ करून मारहाण करत असताना सनी ओरडू लागला म्हणून होंडे याने आपल्याजवळील एअरगन काढून त्याच्या पायाजवळ फायर केली. आणि त्याला मरीआई गेटजवळ सोडून ते निघून गेले.

सीसीटिव्हीने उलगडली खरी स्टोरी

सनीने यानंतर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्याला विचारल्यावर त्याने आधी कुटुंबियांना खरा प्रकार कळेल म्हणून वेगळीच स्टोरी पोलिसांना सांगितली. परंतु पोलिसांनी सीसीटिव्ही तपासले तेव्हा तो त्यांच्यासोबतच गाडीमध्ये बसताना आणि इकडे तिकडे फिरताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी त्याला खरा प्रकार विचारल्यावर त्याने घडलेली खरी हकीकत सांगितली.

होंडे नगरचा सराईत

होंडे हादेखील अहमदनगरधील सोनई पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो दापोडीमध्ये एका नातेवाईक महिलेकडे राहतो. दरम्यान त्या रात्री तो दापोडीतीलच काही तरुणांसोबत दारू पिण्यासाठी आला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यश सुर्यवंशी करत आहेत.

Loading...
You might also like