तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या जवानाच्या पत्नीची धावाधाव

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय सैन्याबाबत सर्वांनाच आदर आहे, मात्र, सैन्यातील एक जवान बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी कुठलेच प्रयत्न होत नसल्याचे वृत्त आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मी पतीच्या शोधार्थ फिरत आहे. संरक्षण राज्यमंत्र्यांना भेटूनही उपयोग झालेला नाही. मुलीचे शिक्षणही सुरू आहे. शिवाय घरासाठी कर्जही घेतले आहे. हे कर्ज कसे फेडायचे ? आता मी काय करावे ? असे भारती कुवर, सैनिक पत्नी यांनी म्हंटले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र प्रभाकर कुवर हे भारतीय सैन्यदलात अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे कार्यरत होते, १७ डिसेंबर २०१८ मध्ये खडकी (पुणे) येथे प्रशिक्षणासाठी आले. मात्र, त्याचवेळी त्यांची बॅग हरवली. याच बॅगेत त्यांचे ओळखपत्र आणि अन्य साहित्य होते. त्यांनी घरी फोन करुन पत्नीला तशी माहिती दिली. त्यानुसार शोधाशोध केली, मात्र बॅग काही मिळाली नाही. अखेर पुणे आणि नाशिक शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये त्याची तक्रार दिली. तरीही ओळखपत्र व बॅग हाती लागली नाही. या प्रकरणाचा मोठा ताण कुवर यांना होता.

इतकेच नव्हे तर, ओळखपत्राशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाही आणि ते हरवले आहे तर तुम्हाला तवांग येथे जावून योग्य ती कार्यवाही करावी लागेल. असे प्रशिक्षण कार्यालयाने स्पष्ट केले होते. मात्र, तेथे गेलो तर चौकशी लागेल, या भीतीने ते अधिक चिंतीत झाले आणि त्यानंतर ते बेपत्ता झाले. आपले पती प्रशिक्षण कार्यालय, तवांग किंवा घरी नसल्याने भारती कुवर या चिंतीत झाल्या. त्यांनी सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली. काही दिवस वाट पाहिली. अखेर पुणे, नाशिक, धुळे आणि अन्य ठिकाणी पोलिस स्टेशनमध्ये रविंद्र कुवर यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली.

विशेष म्हणजे, आठ वर्षाची मुलगी आणि मी असे दोघेही आम्ही त्यांची आतूरतेने त्यांची वाट पाहत आहोत. असे भारती कुवर सैनिक पत्नी यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर, यासंदर्भात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेतली. त्यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांशी फोनवर बोलणी केली. त्यानंतर पुण्याच्या आयुक्तांसह जिल्हाधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि विविध अधिकारी, कर्मचारी आणि विविध सरकारी कार्यालयांमध्ये गेले. पण, अजूनही माझे पती सापडत नाहीत. किंबहुना त्यांच्या शोधासाठी काहीच हालचाली होत नसल्याची खंत भारती यांनी व्यक्त केली आहे.

याचबरोबर, देशभरात जवानांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त केले जात असताना माझ्या पतीचा शोध का घेतला जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच विविध ठिकाणी तक्रार आणि अर्ज सादर केले असले तरी काहीच फायदा होताना दिसत नाही, असेही त्यांनी म्हंटले.