भिवंडी : लग्नाच्या वाढदिवशी करायला गेले काहीतरी भन्नाट, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आलं पोलिसांचं बोलावणं

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन –  कोनगाव येथील एका पतीने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी पत्नीला चक्क एक किलो सोन्याचा हार भेट म्हणून दिला. हा हार भेट देतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या पति राजाने हार देताना चक्क हिंदी सिनेमातील एक गाणेही गायले. मात्र ज्यावेळी हि गोष्ट पोलिसांना कळली तेव्हा त्यांनी त्या पतीराजाला बोलावले आणि याची सुरक्षा कशी ठेवणार, असे विचारले. त्यावेळी या पती राजाने दिलेले उत्तर एकूण पोलिसही चक्रावून गेले. कारण भेट दिलेला हा सोन्याचा हार खोटा असल्याचे पतीने सांगितले.

सोशल मीडियावर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला बाळा कोळी यांनी एक किलो वजनाचा सोन्याचा हार भेट दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. कोनगाव पोलिसांनी कोळी यांना पोलीस ठाण्यात बोलावून सोन्याच्या महागड्या हाराची सुरक्षा कशी कराल, एवढी महागडी वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा किंवा इतर अन्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला. मात्र कोळी यांनी हा हार खोटा असल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी याची खातरजमा करण्यासाठी कोळी यांनी कल्याणमधील ज्या ज्वेलर्सच्या दुकानातून हा हार खरेदी केला तेथे जाऊन माहिती घेतली. यावेळी ज्वेलर्स मालकाने हा हार खोटा असून ३८ हजारांना हार खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अखेर पोलिसांनाही हा हार खोटा असल्याची खात्री पटली.