राम मंदिर भूमिपूजनासाठी पुण्यातून एक किलो चांदीची शिला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   अयोध्येत दिनांक ५ ऑगस्ट रोजी होणार्या ऐतिहासिक राममंदिर भूमिपूजनासाठी पुणे शहर भाजप आणि सामाजिक कार्यकर्ते नवीन सिंग यांच्या माध्यमातून चांदीची एक किलो वजनाची शिला आज अयोध्येकडे रवाना करण्यात आली.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते या शिलेचे विधिवत पूजन करण्यात आले. संतोष खांदवे, नवीन सिंग, बापू खरात, मिलिंद गायकवाड, मोहनराव शिंदे सरकार, बाळासाहेब थोरवे, प्रेम राय, विनीत वाजपेयी, नितीन खरात, मुकेश जाधव, अतुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, ‘अयोध्येत श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभारावे ही प्रत्येक भारतीयांची मनोकामना आहे. यासाठी प्रत्येकाला आपले योगदान द्यायचे आहे. त्याच भावनेतून माजी सैनिक दरोगा सिंग यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबाने एक किलो चांदीची शिला अर्पण केली आहे. आज तिचे पूजन करून अयोध्येकडे रवाना करताना विशेष आनंद होत आहे.’

मुळीक पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन होत आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. पुणेकरांनी हा क्षण एक उत्सव म्हणून साजरा करावा. सर्वांनी आपल्या दारात गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करावा. हा आनंद साजरा करीत असताना शारिरीक अंतर ठेवण्याचा नियम कटाक्षाने पाळावा.’

चौकट

‘मंदीर वही बनाएंगे’

‘मंदीर वही बनाएंगे, मगर तारीख नही बताएंगे,’ या शब्दात भारतीय जनता पार्टीची खिल्ली उडवणाऱ्यांची या निमित्ताने बोलती बंद झाली असल्याचा टोला भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या निमित्ताने लगावला. मुळीक म्हणाले, “भारतीय जनता पक्षाने कधीच धर्माचे किंवा भावनिक राजकारण केले नाही. न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास ठेऊन भाजपा मंदिराच्या बांधकामासाठी कटीबद्ध होता. त्यामुळे विलंब झाला. आता प्रत्यक्षात मंदिर बांधण्याचा दिवस जवळ आल्याने भाजपावर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली आहेत. मंदिराच्या बांधकामाला स्वच्छ मनाने पाठींबा देत येत नसेल तर हरकत नाही परंतु, अकारण विरोध करुन भारतीय समाजाच्या भावना दुखावण्याचे काम कोणी करु नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.