झारखंड : मतदानावेळी पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात तरूणाचा मृत्यू, EVM मशिन जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानास ३० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. आज मतदानाचा दुसऱ्या टप्पा असून मतदानाच्या वेळी एक हिंसक घटना घडली आहे. गुमला जिल्ह्यातील सिसई येथील मतदान केंद्रावर ही घटना घडली असून यात मतदारांवर दगडफेक करण्यात आली होती. यावेळी दगडफेक करत असताना पोलिसांनी गोळीबार केला परंतु पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यानंतर तेथील निवडणूक कर्मचाऱ्यांनी पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी ईव्हीएम आपल्या ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले.

झालेला प्रकार असा की मतदारांना जबरदस्तीने मतदान करण्यापासून रोखण्य़ात येत होते. त्यामुळे तेथील जमावाकडून दगडफेक करण्यात येत होती. तेथील नागरिकांनी पत्रकारावरही हल्ला केला असून निवडणूक आयोगाने या प्रकरणी अहवाल मागविला असून अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळी सीआरपीएफची तुकडी देखील रवाना करण्यात आली असून मतदान केंद्राच्या आसपासचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

या गोळीबारात एकाचा मृत्यू तर काही नागरिक जखमी झाले आहेत. यापैकी एकाची स्थिती गंभीर असून जखमीला रांचीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गुमला पोलिस प्रमुखांनी सांगितले की, मतदार जबरदस्तीने मतदान करत असल्याने पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आले. परंतु मतदारांकडून मतदान केंद्रावर आणि सुरक्षा पथकावर दगडफेक करण्यात आल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पोलिसांनी झाडलेल्या गोळीबारात जिलानी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या ठिकाणी अजूनही दगडफेक सुरूच असून तणावाचे वातवरण निर्माण झाले आहे.

Visit : Policenama.com