पुणे-सोलापूर महामार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, 1 ठार 1 जखमी

यवत/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-सोलापूर महामार्गावर आज (रविवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात (accident) एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. हा अपघात (accident) महामार्गावरील अन्नपूर्णा हॉटेल समोर झाला. मिनीबस, कंटेनर आणि व्हॅगनआर कारचा अपघात झाला. या अपघातामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक काहीवेळ खोळांबली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या बाजूने येणारी मिनीबस चालकाचे नियंत्रण सुटले. महामार्गाचा दुभाजक ओलांडून मिनीबस विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवर गेली. त्याचवेळी पुण्याच्या बाजूने सोलापूरच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरची धडक मिनीबसला बसली. यामध्ये मिनीबस जागेवरच पलटी झाली. मिनीबसमध्ये केवळ दोन व्यक्ती असल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, कंटेनर चालकाचे देखील गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर विरुद्ध बाजूच्या मार्गिकेवर गेला.

कंटेनमधील लोखंडी पट्ट्या महामर्गावर पडल्या होत्या. त्याचवेळी सोलापूरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या व्हॅगनर कार कंटेनरला धडकता-धडकता थोडक्यात बचावली. त्यावेळी कारमध्ये चार लोक प्रवास करत होते. दरम्यान, या विचित्र अपघातामुळे दोन्ही मार्गिकांवर मोठा अडथळा निर्माण झाला होता. वाहतुक पोलीस आणि यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुण्याकडे जाणारी वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवली. तर सोलापूरकडे जाणारी वाहतूक बराचवेळ खोळांबली होती.