पुतण्याचा मोबाईल चोरणाऱ्याचा पाठलाग करताना काका थेट रेल्वेखाली …. 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई येथील रेल्वे स्थानकावर बोरीवलीहून सुरतकडे जाणाऱ्या रेल्वेची वाट बघत काका-पुतणे बसले होते. त्याचदरम्यान मोबाईल चोरीमुळे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या काका पुतण्याचा हा प्रवास जीवावर बेतला. मोबाईल चोरट्याचा पाठलाग करणारे काका सरळ रेल्वे लोकलखाली आले. या घटनेचा थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याबाबत मिळालेलीच अधिक माहिती अशी की, स्थानकावर काकाच्या बाजूला बसलेला पुतण्या मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न होता. त्याचदरम्यान मोबाइल चोरांनी गेम खेळत असलेल्या पुतण्याच्या हातातून मोबाईल चोरी करून पळ काढला. मोबाईल खेचून मोबाइल चोरांनी समोर येणाऱ्या ट्रेन कडे न पाहता ट्रॅकवर उडी घेतल्यावर तात्काळ काका (फिर्यादी) सीबी ढोले यांनी देखील उडी घेतली. काकाने चोराचा ट्रॅकवर उतरुन पाठलाग करण्याच्या नादात ते रेल्वेखाली आले. यात काका गंभीर जखमी झाले असून, कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या मोबाईल चोरांना पकडण्यासाठी गेल्या चार ते पाच दिवसापासून बोरिवली रेल्वे पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. पोलिसांनी सापळा रचून ठेवला होता, असाच गुन्हा करण्यासाठी आलेल्या या आरोपींचा डाव फसला आणि त्यांना पोलिसांनी अटक केली. हर्षद शेख ,परमेश्वर शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत.