दिल्लीत मुख्यमंत्री नायडू याचे उपोषण ; उपोषणस्थळी एकाची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांचे हे उपोषण एक दिवसाचे असून आंध्र भवनमध्ये ते उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला प्रारंभ केल्यानंतर एका व्यक्तीने यावेळी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्या या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. सदर व्यक्ती आंध्रमधीलच असून त्याच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आपली स्थिती खराब असल्याचे त्या व्यक्तीने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

नायडू यांनी उपोषणाला प्रारंभ करण्यापूर्वी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. आंध्रला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासोबत इतर काही मागण्यांना घेऊन त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आंध्र भवनमध्ये त्यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. नायडू यांनी बोलताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. यावेळी बोलताना, त्यांनी वैयक्तिक टीका थांबवावी असेही नायडू यांनी म्हटले.

आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा तसेच राज्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळी जी वचने देण्यात आली होती, ती पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी करत नायडू यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आंध्रचे विभाजन झाले, इतकेच नाही तर,  विभाजनावेळी आंध्रावर अन्याय झाला असे नायडू यांचे मत आहे. यामुळेच नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम ठोकला होता.

नायडू यांनी सकाळी ८ वाजता उपोषणाला प्रारंभ केला आहे. दरम्यान तेलुगू देसम पक्षाने दिलेल्या माहितीनुसार उपोषण रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. शिवाय उद्या (ता.१२) ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना  निवेदन सुद्धा देणार आहेत असेही समजत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us