राज्यातील सर्व महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग पद्धती !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आता पुन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार आहे. यासंबंधीचे सुधारणा विधेयक गुरुवारी (दि.19) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सादर केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले असून या सरकारने हा निर्णय बदलण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधीचे सन 2019 चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचे विधेयक विधानसभेत सादर केले. हे विधेयक मंजूर होताच राज्यातील सर्व महापालिकांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल. मुंबई महापालिकेत सद्या एक सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार रचना केल्यामुळे प्रभागाचे भौगोलिक क्षेत्र मोठे झाले होते. एवढा मोठा भूभाग असल्यामुळे एका टोकावरील नगरसेवकाला दुसऱ्या टोकावरील नागरिकांशी संवाद साधणे अवघड होते. त्यामुळे नगरसेवकांकडून जनतेची कामे करताना टोलवाटोलवी करावे लागत होते.

प्रभागातील चारही नगरसेवक एकाच पक्षाचे असतील तर त्यांनी विभागानुसार प्रभाग वाटून घेतले होते. मात्र, जेथे एका प्रभागात दोन किंवा त्यापेक्षा अधिक पक्षाचे नगरसेवक विजयी झाले आहेत तेथे विकास कामांवरून सातत्याने वाद होत होते. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग पद्धती पुन्हा लागू होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/