Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळे बांधकाम उद्योगाला तब्बल 1 लाख कोटींचा फटका !

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे देशभरातील बांधकाम उद्योगाला अंदाजे एक लाख कोटींचा फटका बसला आहे. उद्योग पुन्हा उभारी घेण्यासाठी दोनशे अब्ज इतक्या भरभक्कम आर्थिक साहाय्याची गरज असल्याचे मत ‘नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’चे अध्यक्ष डॉ. निरांजन हिरानंदानी यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनामुळे बांधकाम उद्योगापुढे खूपच मोठे संकट उभे राहिले आहे. आधीच मंदीत असलेला हा उद्योग उभारी घेत असतानाच कोरोनाचे संकट आल्यामुळे हादरला आहे. कोरोनामुळे अनेक परदेशी कंपन्यांनी आपली गुंतवणूक काढून घेतली आहे. त्यांच्याकडे मोठी गुंतवणूक उपलब्ध असून डबघाईला आलेले बांधकाम उद्योग या परदेशी गुंतवणूकदारांकडून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय कंपनी लवादाने एखादा उद्योग दिवाळखोरीत काढला तर या परदेशी कंपन्या टपल्या आहेत. त्यामुळे लवादाच्या कामकाजाला सहा महिन्यांपर्यंत स्थगिती देण्याची आग्रही मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे डॉ. हिरानंदानी यांनी सांगितले.

2008 मध्ये देशात जी मंदी होती त्यापेक्षाही कठीण परिस्थिती आज आहे. त्या वेळी रिझव्र्ह बँकेने वर्षभरासाठी पुनर्रचना योजना जारी केली होती. आताही त्याचीच तातडीने गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनामुळे काही परिसरात घरांच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता आहे. पण जेथे मागणी अधिक व पुरवठा कमी आहे, अशा ठिकाणी किमती खाली येण्याची शक्यता नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले. काही विकासकांना रेडी रेकनरपेक्षाही कमी दरात विकायची असून त्यासाठी प्राप्तिकर कायद्यात बदल करावा लागणार असून तशी शिफारस केंद्राकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.