भिवंडी दहावी पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भिवंडीतील दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी नारपोली भागात राहणाऱ्या इन्तेखाब पटेल याला नारापोली पोलिसांनी अटक केल्यानंतर आता याचप्रकरणी आणखी एकाला अटक झाली आहे. भिवंडीत दहावीचा भुमिती, विज्ञान आणि समाजशास्त्राचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला होता.

पेपरफुटी प्रकरणी अटक झालेला इसम खासगी क्लास चालक असून हफिजूर वजीर रहेमान शेख असे त्याचे नाव आहे. कोर्टाने त्याला 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आज अटक केलेला आरोपी इन्तेखाब पटेल हा देखील भिवंडी खासगी क्लास चालवत होता, तसेच विद्यार्थ्यांना घरी जाऊनही शिकवत असे.

ज्याठिकाणी इन्तेखाब शिकवायला जायचा त्या विद्यार्थ्यांना तो १ तास आधी पेपर व्हाॅट्सअॅपवर पाठवायचा. त्यानंतर इतर ट्युशन ग्रुपवर तो व्हायरल होत असे. इन्तखाब पटेल हा रहेमान वजीर शेख याच्या संपर्कात होता. आरोपी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एका पेपरचे तीन हजार रुपये घेत होता, अशी माहिती समोर येत आहे. भिवंडी आणि नारपोली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

दहावीचा समाजशास्त्र विषयाचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. त्याआधी १५ मार्च आणि १८ मार्चला विज्ञानाचे पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला होता.