आजपासून ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात, स्थलांतरितांना होणार लाभ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   केंद्र सरकारने आजपासून 20 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात केली आहे. या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे.बायोमेट्रिक अथवा आधार वैधतेनंतर अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा फायदा 67 कोटी लोकांना फायदा होणार आहे. यापूर्वी ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा पायलट प्रोजेक्ट चार राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गुजरात या राज्यांमध्ये रेशन कार्डाच्या पोर्टेबिलिटीची सुविधा देण्यात आली होती. त्यानंतर 8 राज्यात एक जानेवारीपासून या योजना अमंलात आली होती. आता उर्वरीत सर्व राज्यात ही योजना सुरू करण्यात आली आहे. वन नेशन ‘एक देश एक रेशन कार्ड’ ही मोदी सरकारची महत्त्वांकाक्षी योजना आहे. ही योजना लागू झाल्यानंतर कोणताही रेशनकार्डधारक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही राज्यातल्या रेशन डेपोवरुन धान्य घेऊ शकतो. एखादा माणूस महाराष्ट्रात कामगार म्हणून आला आहे. तो परप्रांतीय आहे. तर ही योजना लागू झाल्यानंतर त्याला महाराष्ट्रातल्या रेशन दुकानातही तेच कार्ड दाखवून रेशन मिळू शकणार आहे. या योजनेनुसार लाभार्थ्यांची ओळख ही त्यांच्या आधार कार्डवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल डिव्हाइसद्वारे केली जाऊ शकते. कारण यामध्ये लाभार्थ्यांची माहिती फिड करण्यात आली आहे.