एक, दोन नव्हे तर चक्क तीन सख्ख्या बहिणी बनल्या महाराष्ट्र पोलिस 

मंगरुळपीर : पोलीसनामा ऑनलाईन- सावित्रीबाई, महात्मा जोतिराव फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली. तऱ्हाळा येथील नारायण वाघमारे यांनी आपल्या मुलींना चांगले शिक्षण देऊन नोकरीला लावले. एक, दोन नव्हे तर त्यांच्या चक्क तीनही मुली आज महाराष्ट्र पोलिस दलात शिपाई म्हणून रुजू झाल्या आहेत. त्यामुळे ते म्हणतात की, मला काही मुलगा नाही. तीनही मुलीच आहेत याची कधी खंत नाही भासली. कारण त्यांनी नेहमी जिद्द व चिकाटीने प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. त्यामुळे मला माझ्या तीनही मुलींचा अभिमान वाटतो. तऱ्हाळा येथील महिला पोलिस म्हणून रुजू झालेल्या त्या पहिल्याच सख्ख्या तीनही बहिणी समाजासमोर एक आदर्श ठरत आहेत.

मंगरूळपीर तालुक्‍यातील शेलुबाजार येथून जवळच असलेल्या तऱ्हाळा येथील शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या नारायण वाघमारे यांना तीन मुली आहेत. मुलींच्या जन्माने खचून न जाता त्यांनी तीनही मुलींना चांगल्या संस्कारात वाढवलं त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट सतत त्यांच्या डोळ्यासमोर ठेवले. त्यामुळे या तीनही बहिणींनी जिद्द व चिकाटीमुळे शिक्षण व त्यानंतर पोलिस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्नांची परिसीमा गाठली. त्यामुळे या तीनही बहिणी आज महाराष्ट्र पोलिस दलात सेवा देत आहेत. मुलगा असो किंवा मुलगी चांगले संस्कार, जिद्द व चिकाटी असली की,अशक्‍य काहीच नसते. याचा आदर्श समाजाने घ्यायला हवा.

नारायण वाघमारे यांची मोठी मुलगी प्रिया (वय 24), भाग्यश्री (वय 21) व श्रद्धा (वय 19) या तिघींचे प्राथमिक शिक्षण तऱ्हाळा येथे, माध्यमिक शिक्षण शेलुबाजार व पदवीचे शिक्षण मंगरूळपीर या तालुक्‍याच्या ठिकाणी झाले. शिक्षणासोबतच नोकरीची जिद्द मनात ठेवून प्रयत्न सुरू केले. त्यामुळे प्रिया ही 2013 च्या पोलिस भरतीत शिपाई पदाकरिता पात्र ठरली. मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून भाग्यश्री व श्रद्धा यांनी पोलिस दलातील सेवेकरिता प्रयत्न सुरू केले. 2018 मध्ये झालेल्या पोलिस भरतीमध्ये या दोन्ही बहिणींची निवड झाली. तसेच त्या ता. 7 जानेवारी 2019 रोजी पोलिस दलातील सेवेत रुजू झाल्या. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलात सेवा देत, कायद्याचे रक्षण करणाऱ्या या तीनही मुली निराश झालेल्या तरुणींसाठी एक उदाहरणच आहेत.