सावकारांच्या तगाद्याने एकाची आत्महत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – पैशांसाठी तगादा लावल्याने एकाने सांगलीत रेल्वेखाली आत्महत्या केली. शिवाजी तुकाराम कदम (वय-३१ रा. घाणंद ता. आटपाडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुणे, उस्मानाबाद, सांगली मधील ११ सावकारांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि सावकारी अधिनियमाप्रामाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम कोहिनकर, पांडुरंग किसन कोहिनकर, दादा दाभाडे (तिघे रा. तळेगाव, पुणे), धनाजी गायकवाड (रा. बिजलीनगर, पुणे), पांडुरंग (पूर्ण नाव नाही, रा. कवठेमहांकाळ), दिनेश ससाणे (रा. उस्मानाबाद), राजू हातकणंगलेकर, राणी हातकणंगलेकर, रेचल नायर, रवि नायर, अजय नायर (सर्व रा. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तुकाराम नामदेव कदम (वय – ६०, रा. घाणंद, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

सावकारांच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केलेल्या शिवाजीने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात म्हटले आहे की, पाच वर्षांपूर्वी शिवाजी पुण्यात रहात होता. त्यावेळी तेथे त्याने प्रेमविवाह केला होता. तेथे सासरच्या मंडळींकडून त्रास होताना तो सांगलीतील गणेशनगर येथे येऊन राहिला होता. मात्र कामधंदा नसल्याने त्याने पुण्यातील काही लोकांसह सांगलीतील काहीजणांकडून एक ते तीन लाख रूपये व्याजाने घेतले होते. त्यापोटी संबंधितांनी त्याच्याकडून लाखो रूपये वसूल केले आहेत. शिवाय अनेकांनी त्याने दिलेले धनादेश न वटल्याने त्याच्यावर न्यायालयात खटलेही दाखल केले आहेत.

या सर्व सावकारांच्या आणि सासरच्या मंडळींकडून त्याला वारंवार त्रास दिला जात होता. मोबाईलवरून त्याला धमक्या दिल्या जात होत्या. हे प्रकार वारंवार घडल्याने त्याने संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये सावकारांविरोधात तक्रारीही दिल्या होत्या. मात्र त्याच्या तक्रारींची दखल घेतली नाही असा उल्लेखही त्याने चिठ्ठीत केला आहे. सांगलीत रहायला आल्यानंतर त्याचा पत्नीशी वारंवार वाद झाला. त्यानंतर पत्नी त्याला सोडून गेली. नंतर सासरच्या मंडळींनीही त्रास दिल्याचे त्याने चिठ्ठीत म्हटले आहे.

दरम्यान शिवाजीने मंगळवारी रात्री भारती हॉस्पिटलच्या पिछाडीस रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. त्यावेळी त्याच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीनुसार सर्व संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. सोनवलकर करत आहेत.

शिवाजीने आत्महत्या करण्यापूर्वी सावकारांसह सासरच्या मंडळींच्या नावाचा उल्लेख केला आहे. शिवाय उस्मानाबाद येथील एक पोलिस दिनेश ससाणे यानेही फोनवरून धमकी दिल्याचा उल्लेख त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत करण्यात आला आहे. शिवाय त्याने चिठ्ठीसोबत त्याचा मोबाईलही ठेवला होता. त्यामध्ये फोनवरून त्रास देणार्‍यांचे कॉल रेकॉर्डिंग असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. त्याद्वारे आता पोलिस तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले.

ह्याहि बातम्या वाचा

जेव्हा ‘शेर’ आपल्या मैदानात फलंदाजीसाठी उतरतो

दोन सराईत गुंड तडीपार

“मनसेला आघाडीत घ्यायच की नाही यावरून काँग्रेसमध्येच दोन गट”