‘या’ कारणामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा ‘कोरोना’चा धोका

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – कोरोना जगभर थैमान घालत असताना आणि अमेरिकेत त्याचा कहर अजूनही सुरु असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा पुन्हा धोका निर्माण झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा खासगी सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे व्हाईट हाऊस हदरले आहे.

या घटनेनंतर व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काळजी करण्याची कोणतीही गोष्ट नाही. ट्रम्प यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र, त्याचवेळी ‘आजपासून मी रोज कोरोना चाचणी करणार आहे’, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेली व्यक्ती अमेरिकेच्या नौदलातील असून ती राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक सेवेत तैनात होती. ही व्यक्ती सैन्याच्या एका एलिट युनिटचा भाग आहे. राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबाची हे युनिट काळजी घेते. अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबाच्या अगदी जवळ काम करते. राष्ट्रपतींच्या भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी या व्यक्तीची होती. ते बहुतेक वेळा त्यांच्या भेटीदरम्यान, राष्ट्राध्यक्षांसोबत असतात.

या व्यक्तींमध्ये बुधवारी कोरोना संसर्गाची चिन्हे दिसू लागली. त्याची चाचणी केल्यानंतर त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. ही व्यक्ती कोठून संक्रमित झाली, याचीही तपासणी केली जात आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांचीही चाचणी घेण्यात आली असून दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत