५ हजार रुपयांची लाच घेताना रेशीम कार्यालयातील तांत्रिक अन्टी करप्शनच्या जाळ्यात

वाशिम : पोलीसनाम ऑनलाईन – रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेल्या शेड देयकाची फाईल पुढे पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा रेशीम विकास कार्यालयाच्या तांत्रिक अधिकाऱ्याला अन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले.

संदिप मोरे असे त्याचे नाव आहे.

तक्रारदार शेतकऱ्यासह गावातील इतर तीन शेतकऱ्यांनी शेतात मनरेगाअंतर्गत तुती लागवड केली आहे. जिल्हा रेशीम विकास कार्यालयाकडून लागवड व शेड बांधकामाकरता व मजूरीसाठी ३ लाखांचे अनुदान दिले जाते. चारही शेतकऱ्यांनी शेड बांधकाम पुर्ण करून संपुर्ण कागदपत्रे देयकांसह कार्यलयात सादर केली.

त्यानंतर संदिप मोरे याने त्यांच्याकडे प्रत्येकी २ हजार अशी ८ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याचा पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदार यांनी अन्टी करप्शनकडे याची तक्रार केली. त्यानंतर अन्टी करप्शनच्या पथकाने याप्रकरणी सापळा रचून त्याला ५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडले.