खळबळजनक ! पुण्यात वडिलांचा बॅटने खून करून मृतदेह शेतात जाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरून जन्मदात्या पित्याचा डोक्यात बॅट घालून खून केला. त्यानंतर मृतदेह शेतात जाळून टाकल्याची खळजनक घटना पुण्यातील पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपीने वडिलांचा मृतदेह शेतात जाळल्यानंतर पौड पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करून गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना मुळशी तालुक्यातील सुर्वेवाडी येथे मंगळवारी (दि.5) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. नामदेव नथू सुर्वे (वय-70) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्यांचा मुलगा मारुती सुर्वे (वय-35) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पौडजवळ दारवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुर्वेवाडी गावात नामदेव यांचा मुलगा मारूती आणि नातू असे तिघेजण राहतात. नामदेव आणि मारुती यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत होते. मंगळवारी देखील त्यांच्यामध्ये वाद झाले. याच वादातून मारुती याने वडील नामदेव यांच्या डोक्यात रात्री अकराच्या सुमारास बॅट घातली. बॅटचा वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याने मृतदेह घरासमोरील शेतातील ओढ्यात नेऊन जाळला.

बुधवारी (दि.6) सकाळी सहाच्या सुमारास मारूती याने पौड पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस नाईक संदीप सकपाळ, पोलीस हवालदार सतीश मगर, मयूर निंबाळकर, सुनील कदम, पोलीस पाटील प्रकाश बलकवडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.