‘एक PC पण CP ला नडू शकतो’ अशी डायलॉगबाजी करणारा पोलिस निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वारगेट पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकासह महिला कर्मचार्‍यांशी असभ्य वर्तन केल्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात प्रचंड राडा घालणार्‍या तसेच ‘एक PC पण CP ला नडू शकतो’ अशी डायलॉगबाजी करणार्‍या पोलिस कर्मचार्‍याला निलंबीत करण्यात आले आहे. पोलिस कर्मचार्‍याला दि. 15 फेब्रुवारी रोजी निलंबीत करण्यात आले असले तरी ही बाब आज उजेडात आली आहे.

पोलिस शिपाई योगेश नाथा बंडगर (बक्‍कल नं. 10236) असे निलंबीत करण्यात आलेलेल्या पोलिसाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बंडगर हे बिबवेवाडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. ते स्वारगेट येथील सहाय्यक आयुक्‍त (एसीपी) कार्यालया बाहेर असलेल्या सुसाई स्नॅक्स सेंटर समोर राखाडी रंगाचा गोल गळयाचा टि शर्ट व ट्रॅक पॅन्ट परिधान करून उभे होते. त्यावेळी स्वारगेट पोलिस ठाण्यातील एक उपनिरीक्षक आणि महिला कर्मचारी तेथे चहा पित होत्या. बंडगर हे त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्याकडे पाहुन त्यांचे बोलणे ऐकत होते. पोलिस उपनिरीक्षकांनी त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. बंडगर यांनी मी पण पोलिस आहे असे सांगितले.

पोलिस उपनिरीक्षकांनी त्यांच्याकडे नाव आणि नेमणुकीबाबत विचारणा केली. बंडगर यांनी त्यांना उत्‍तर दिले नाही. ‘उलट पोलिस स्टेशनला चल, मी तूला दाखवितो’ असा ऐकरी भाषेत संवाद केला. बंडगर यांना स्वारगेट पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्याकडे पुन्हा त्यांच्या नेमणुकीबाबत आणि नावाबाबत विचारणा करण्यात आली.. त्यावर बंडगर हे प्रचंड भडकले. त्यांनी पोलिस उपनिरीक्षकाच्या कानाखाली मारली. बंडगर यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात राडा घातला. तेथील काच स्वतःच्या डोक्यावर आणि हातावर फोडण्याचा प्रयत्न केला. ‘एक PC पण CP ला नडू शकतो’ असे म्हणत बंडगर हे पोलिस उपनिरीक्षकाच्या अंगावर धावुन गेले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून बंडगर यांना नियंत्रणात आणले. चौकशीअंती बंडगर यांना दि. 15 फेब्रुवारी रोजी निलंबीत करण्यात आले आहे.