पुण्यात खळबळ ! एकतर्फी प्रेमातून गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेमातून गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना खडकवासलाजवळील कोल्हेवाडी येथे घडली आहे. आरोपीने कारमधून जाणाऱ्यावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बुधवारी (दि.26) दुपारी किरकटवाडी फाटा येथे घडली. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

अक्षय उर्फ रावण चंद्रकांत दुबे (रा. कोल्हेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कोल्हेवाडी येथे राहणाऱ्या 45 वर्षाच्या व्यक्तीने हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादी यांच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हवेली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले की, फिर्यादी हे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास कोल्हेवाडी येथील हॉटेल मुक्ताई येथे आले. त्यांना त्या ठिकाणी आरोपी दुबे दिसला. त्यांनी तू आमच्या नातेवाईक महिलेला का त्रास देतो, त्यांच्या घरी मोबाईल फोन व चायनीज पदार्थ का पाठवले, असे विचारले. यावरुन आरोपी दुबे आणि फिर्यादी यांच्यात बाचाबाची होऊन झटापट झाली. यावेळी आरोपीने त्याच्याकडे असलेली पिस्तुल फिर्यादी यांच्यावर रोखली.

फिर्यादी हे आरोपीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येत होते. वाटेत किरकटवाडी फाटा येथे ते आले असता आरोपी अक्षय याने भाचा शुभमच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेतली. त्याने फिर्यादी यांच्यावर गोळी झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी आरोपी विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडल्याचे त्यांनी सांगितले.