Coronavirus : कोल्हापूरमध्ये ‘कोरोना’चा हाहाकार ! 2 दिवसात हजार रूग्ण, उपजिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक, 6 नामांकित डॉक्टर पॉझिटिव्ह

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी, शहरातील सहा नामांकित डॉक्टर, पोलीस निरीक्षक, कोरोना उपचार कक्षातील तीन डॉक्टर यांच्यासह दोन दिवसांत तब्बल हजारावर लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. मागील तीन दिवसांमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सहा हजारावर गेल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जून अखेर केवळ 118 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे हा जिल्हा कोरोना संक्रमणाच्या बाबतीत सुरक्षीत असल्याचे मानले जात होते. पण 1 जुलै पासून जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली.

दररोज दोनशे ते तिनशे जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येऊ लागले. यानंतर हा आकडा चारशे ते पाचशेवर गेला. दोन दिवसांपूर्वी पाच हजारापर्यंत पोचलेला कोरोना बाधितांचा आकडा गुरुवारी सहा हजारांवर गेला. यामुळे तीस दिवसांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 118 वरून सहा हजारांवर पोहोचल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसात निवासी उपजिल्हाधिकारी, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील तीन डॉक्टर, पोलीस निरीक्षक यांच्यसह अनेकजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. याचा धसका आता लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी घेतला आहे. एका आमदारा पाठोपाठ जिल्हाधिकारी यांना देखील ‘नो व्हिजिटर्स’ असा फलक दरवाजावर लावण्याची वेळ आली आहे.

शहरातील हॉटेल्स ताब्यात घेणार
दरम्यान, जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 165 पेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी सायंकाळपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या सहा हजारावर गेली आहे. आज दिवसभरात तीनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने उपचारासाठी बेड कमी पडत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. उपचारासाठी आता मंगल कार्यालये, खासगी दवाखाने यासह काही हॉटेल्स देखील ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.