COVID-19 : ‘कोरोनाचा बाऊ केला जातोय’ : खा. उदयनराजे भोसले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरोनाबाबत बोलताना, आलेल्या परिस्थितीला न घाबरता सामोरं जाण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाचा विनाकारण बाऊ केला जातोय, स्वीडनमध्ये ज्याप्रकारे हर्ड इम्युनिटी पद्धतीचा वापर केला जात आहे. त्याप्रमाणे भारतानेही वापर करावा, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. तसेच, कोरोना संकटाच्या कुणीही राजकारण करू नये, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी कोरोनाबाबतचे आपले मत मांडले आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले की, मला काही तज्ज्ञांकडून माहिती मिळाली आहे. त्यानुसार पाहिलं तर एकूण 3 ट्रिलियन्स व्हायरस आहेत, त्यामुळे कोरोना अनेकांना होऊनही गेला असेल, पण आपल्या रोगप्रतिकारकशक्तीने त्यावर मात केली असेल. कोरोना हा वन ऑफ द व्हायरस इज, त्यामुळे एवढा बाऊ करायचा विषय नाही. दुर्दैवाने इतरही अनेक व्हायरसमुळे लोकांचे निधन झालेलं आहेच. लोकांनी या व्हायरसला घाबरून न जाता वस्तुस्थिला सामोरं गेलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील एकमेकांवर होणाऱ्या टीकांबद्दल बोलनातान उदयनराजे भोसले म्हणाले की, ह्यांनी त्यांच्यावर केली अन् त्यांनी ह्यांच्यावर केली, मग त्याना जाऊन विचार. माझा काय संबंध त्यावर बोलायचा, असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी टीकात्मक राजकारणावर बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, भाजपकडून नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असे वादग्रस्त विधान आमदार पडळकर यांनी पंढरपुरमध्ये केले होते. त्यांच्या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावर बोलताना उदयनराजे म्हणाले, मला विचारू नका, कोणी कोणाबद्दल काय बोलले हे त्यांनी मला विचारून बोलले नाही. तसेच जे कोणी उत्तर देणार आहेत, ते मला विचारून देणार नाही. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. त्यामुळे गोपीचंद पडळकर आणि शरद पवार यांचं ते बघून घेतील, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले.