चेंबरमधील विषारी वायुमुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक शहरातील सीबीएस परिसरात गटारीच साफसफाई करताना एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर दोन सफाई कामगारांची प्रकृती चिंताजन आहे. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास शिवाजी स्टेडियमजवळ घडली.
अशोक रामपसे यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर बाळू खानझोडे आणि सोमनाथ चौधरी या दोघांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी स्टेडिअममध्ये यशवंत व्यायामशाळेच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या चेंबरच्या साफसफाईचं काम सुरु होते. त्यासाठी चार कर्मचारी तेथे काम करत होते. त्यापैकी सकाळी अकराच्या सुमारास अशोक रामपसे हा कर्मचारी चेंबरमध्ये उतरला.

मात्र गटारातील विषारी वायुमुळे त्याला त्रास होऊ लागला. इतर कर्मचाऱ्यांनी रामपसे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने रामपसेचा यामध्या मृत्यू झाला. या घटनेची नोंद भद्रकाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.