कांदा पुन्हा ‘तेजी’कडे !

लासलगाव : वार्ताहर – चाळीत पडून असलेला उन्हाळी कांदाही जास्त आर्द्रता असल्याने सडण्यास सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे देशभरात अति पावसामुळे खरीपातील लाल कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे उन्हाळ कांद्याच्या मागनित वाढ झाल्याने आज येथील मुख्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त २४५१ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. कांदा दरात जरी सुधारणा झाल्याचे दिसत असले तरी उन्हाळ कांद्याचे चाळी मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या भाव वाढीमुळे शेतकऱ्यांचे थोडे फार नुकसना भरून निघण्यास मदत होणार आहे.

राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या सेन्सेटिव्ह पिक म्हणून कांदा ओळखला जातो. उन्हाळ कांद्याला एप्रिल महिन्यामध्ये सरासरी ६०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले होते मात्र मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग चांगला भाव मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळ कांद्याची चाळीमध्ये साठवणूक केली मात्र वातावरणाच्या फटक्याने हाच कांदा आता खराब होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे

कर्नाटकातील बेळगाव आणि हुबळी परिसरातील कांदा पावसात कुजल्याने त्याची आवक एपीएमसीत होऊ शकलेली नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्य़ातील कांद्याची मागणी वाढल्याने कांदा दर हे दोन हजाराच्या पुढे गेलेले आहे.अनलॉक 4 मध्ये हॉटेल व्यवसाय पूर्णता सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने आता कांद्याची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कांदा दरात सुधारणा होऊ शकेल असा जाणकारांचा अंदाज आहे. येथील मुख्य बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी १००० सरासरी २००० तर जास्तीत जास्त २४५१ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला

देशातील प्रमुख बाजार समितीचे कमाल कांदा दर
(आकडेवारी एनचआरडीएफ नुसार)

लासलागावं – २४५१
अलीगड – १५५०
भटिंडा -२०००
दिल्ली -१७५०
कानपुर -१३००
राजकोट -१६५०
पुणे -१९००