लासलगाव बाजार समितीत सलग दुसऱ्या दिवशीही कांदा लिलाव ठप्प

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – बळिराजाने लिलावासाठी कांदा न आणल्याने तर जुना खरेदी केलेल्या कांद्याची विल्हेवाट लागेपर्यंत व्यापाऱ्याकडून नवीन खरेदी करणार नसल्याने आज सलग दुसऱ्या दिवशीही लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलावाचे कामकाज ठप्प होते. दोन दिवसात लिलाव ठप्प असल्याने बाजार समितीत ६ कोटींची उलाढाल ठप्प झाली. हे लिलाव पुन्हा पूर्ववत करावेत, अशी मागणी काही शेतकरी संघटनांनी केली.

दक्षिणेतील कांद्याचे पावसाने नुकसान केल्याने देशांतर्गत ग्राहकांपुढे नाशिकच्या कांद्याखेरीज पर्याय उरलेला नव्हता. त्यामुळे निर्यातबंदीचा निर्णय करूनही भावात फारसा फरक पडला नसल्याने केंद्र सरकारने साठवणुकीवर निर्बंध घातले. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या आगारात दिवसाला आवक होणाऱ्या ६ ते ७ हजार क्विंटल कांद्याच्या लिलावातून होणारी सहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.

राज्यातील उपाहारगृहे सुरू झाल्यानंतर मागणीत वाढ झाल्यामुळे गेल्या आठवडय़ात प्रारंभी सात हजारांचा टप्पा ओलांडणारा कांदा केंद्र सरकारच्या साठवणूक मर्यादेच्या निर्णयानंतर सुमारे उन्हाळ कांदा अकराशे तर नवीन लाल कांदा २३०० रुपयांनी घसरला होता. कांदा दरवाढ रोखण्यासाठी मागील वर्षी केंद्राने जे काही उपाय केले होते, त्याची पुनरावृत्ती यंदाही होत आहे.

साठवणुकीच्या मर्यादेमुळे जागेचा प्रश्न तयार झाला आहे मात्र ज्यांच्या कडे जागा आहे, असे इच्छुक व्यापारी सहभागी होऊ शकतील असे व्यापारी सांगत आहे. तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला नसल्याने लिलाव झाला नसल्याचे स्पष्टीकरण बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. किरकोळ व्यापाऱ्यांना दोन टन आणि घाऊक व्यापाऱ्यांसाठी २५ टनांच्या साठवणुकीचे निर्बंध केंद्र सरकारने लागू केले आहेत. खरे म्हणजे, हे पहिल्यांदा घडते असे नाही. निर्यातबंदी, साठवणूक मर्यादा आणि प्राप्तिकर विभागाचे छापे हे पूर्वीप्रमाणे आताही ‘रिपीट’ झाले आहेत.मात्र या सगळ्या मध्ये भरडला जातो तो शेतकरी. एन सणासुदीला शेतकर्याला पैशाची गरज असताना कांदा लिलाव ठप्प झाल्याने दिवाळीचा सण कसा साजरा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे.