परतीच्या पावसाने कांदा तेजीत ! लासलगाव बाजार समितीत एका दिवसात 4 कोटींची उलाढाल

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –    हॉटेल व्यवसाय सुरू झाल्याने वाढलेली मागणी आणि अतिवृष्टीने खरिपाच्या कांद्याचे झालेले नुकसान यामुळे कांदा पुन्हा भाव खात आहे.आज येथील मुख्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमाल ७८१२ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. आज तर कांद्याने वर्षभरापूर्वी मिळालेल्या सात हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. परतीच्या पावसाचा फटका कांद्याला बसल्याने नव्या कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी, बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याचे भाव वाढत आहेत. ही दरवाढ आणखी महिनाभर राहील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला मागणी वाढली आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात नवीन कांद्याचा हंगाम सुरू होतो. यंदा नवीन कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. डिसेंबपर्यंत नवीन कांद्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत जुन्या कांद्याचे दर तेजीत राहणार असल्याने कांदा तेजीतच राहील असे चित्र आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नवीन लाल कांद्याला ११ हजार १११ रुपये इतका उच्चांकी ऐतिहासिक बाजार भाव लासलगाव बाजार समिती मिळाला होता. उन्हाळ कांद्याला ही चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड मोठी केल्याने १३० टक्के इतके उत्पादन निघाले होते. उन्हाळ कांद्याचे उत्पादन जास्त झाल्याने त्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने देशासह विदेशातही लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे कांद्याला मागणी घटल्यामुळे कांद्याचे उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले होते. कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा हा तोट्यात विक्री करत होता. त्यात यंदाच्या पावसाळी हंगामात पावसाचे जास्त दिवस राहिलेले मुक्काम आणि परतीच्या पावसाने चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला तर शेतात नवीन लाल कांद्याच्या पिकाचेही मोठे नुकसान झाल्याने मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांद्याचे बाजार भावात दररोज वाढ होत आहे

येथील बाजार समितीच्या मुख्य आवारावर ५३२ वाहनांतुन कांदा ६२०० क्विंटल आवक होऊन कांद्याला कमीत कमी १९०१ सरासरी ७१०० तर जास्तीत जास्त ७८१२ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले.

चार कोटी रुपयांची उलाढाल

लासलगाव बाजार समितीत मंगळवारी (ता.२०) दिवसभरात कांदा खरेदी विक्रीतून ४ कोटी रुपयांची उलाढाल झाली. उन्हाळ कांद्याचे दर तेजीत असल्याने अवघी सहा हजार दोनशे क्विंटल कांद्याची आवक होऊनही चार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाले.