‘कांदा निर्यातबंदी हा एक प्रकारचा घोटाळाच’, शिवसेनेनं जोडला पाकिस्तानशी संबंध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंदी आणि त्यातून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा एक प्रकारे घोटाळाच म्हणावा लागेल. परंतु यावर बोलायला सरकार तयारच नाही असा थेट आरोप शिवसेनेनं मोदी सरकारवर केला आहे. देशातला विरोधी पक्ष क्षीण बनला आहे म्हणून सरकारनं शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. मरणाच्या दारातला शेतकरी आणि कष्टकरीच क्रांतीची मशाल पेटवतो असा इशाराही शिवसेनेनं यावेळी दिला आहे.

कांदा निर्यातबंदी आणि नव्या कृषी विधेयकांच्या मुद्द्यांवरून देशात सध्या वातावरण तापलं आहे. केंद्र सरकारच्या दोन्ही निर्णयाला शेतकरी संघटना व अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. कांदा निर्यातबंदी हा एक प्रकारचा घोटाळाच आहे असं शिवसेनेनं ठासून सांगितलं आहे.

काय लिहलंय सामनाच्या अग्रलेखात ?
‘कांद्याला थोडा बरा भाव मिळताच केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यात बंदीचं फर्मान काढलं. भारताच्या कांद्याला परदेशात चांगली मागणी आहे. आपल्याकडे कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली. याचा फायदा पाकिस्तानला होत आहे. हे सरकारला चालतंय का ? एका बाजूला पाकिस्तानची आर्थिक कोंडी करत असल्याचे ढोल वाजवायचे आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला आर्थिक ताकद मिळेल असे निर्णय घ्यायचे. हे दुटप्पी धोरण आहे. असे निर्णय घेताना यातलं ज्यांना कळतं त्यांच्याशी किमान चर्चा तरी करावी.’ असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

‘केंद्र सरकारनं नवं कृषीविषयक धोरण आणलं. त्याचा लाभ बड्या भांडवलदारांना, मोठ्या व्यापाऱ्यांना जास्त होण्याची शक्यता आहे. छोटे अडते किंवा दलाल बाहेर काढले व मोठ्या गेंड्यांना त्या जागी प्रवेश दिला. हळूहळू शेतकऱ्यांच्या मालाचे भाव हेच मोठे पुंजीपती ठरवतील. सामुदायिक किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं गाजर दाखवलं. त्यामागे मोठ्या कंपन्यांचा स्वार्थ स्पष्ट दिसत आहे.’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.