कांदा निर्यातबंदी ! शरद पवारांनी मोदी सरकारला करुन दिली ‘या’ धोक्याची जाणीव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी तातडीनं चर्चा केली. अशा अकस्मिक निर्णयामुळे निर्यातदार देश म्हणून भारताच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

सोमवारी दुपारी अचानक केंद्र सरकारने निर्यातबंदी जाहीर केली. यानंतर राज्यासह देशातील शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. राज्यातील कांदा उत्पादक भागात या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. याबाबत अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शरद पवार यांनी वाणिज्य मंत्र्यांशी चर्चा केली.

निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण अशा अकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे, त्या प्रतिमेला मोठा धक्का बसू शकतो. भारत हा निर्यातीच्या बाबत एक बेभरवशाचा देश आहे अशी प्रतिमा आंतरराष्ट्रीय बाजारात बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. अशा परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर कांदा निर्यातदार देशांना मिळतो, हा धोका शरद पवार यांनी गोयल यांच्या निदर्शनास आणून दिला.

कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतीच्या आधारावर आला आहे,असे गोयल यांनी पवारांना सांगितले. तरीही केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करुन निर्यातबंदीचा फेरविचार करु, असं आश्वासन पीयूष गोयल यांनी दिलं आहे.

दरम्यान, कांदा प्रश्नी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बैठक बोलावली असून या बैठकीला भाजपचे खासदार उपस्थित राहणार आहेत. यामध्ये डॉ. भारती पवार, डॉ. भामरे, डॉ. सुजय विखे पाटील इत्यादी खासदार उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. संसद भवनातील पीयूष गोयल यांच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे.