कांदा स्वस्त करण्याऐवजी ‘एवढं’च करा, रोहित पवारांनी केंद्राला सुचवला वेगळा उपाय

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कांद्याच्या निर्यातीवरील बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला देशभरातून विरोध होताना दिसला. कांद्याचे भाव वाढल्यानं सामान्य ग्राहकांना फटका बसू नये यासाठी केंद्र सरकरानं हे पाऊल टाकल्याचं सांगण्यात येतंय. यावर कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला वेगळा उपाय सुचवला आहे. सरकारला सामान्यांना दिलासा द्यायचाच असेल तर कांदा नियंत्रित करण्याऐवजी वाढलेल्या पेट्रोल डिझेलचे दर निंयत्रित करावेत अशी सूचना पवारांनी केली आहे.

काय म्हणाले रोहित पवार ?
रोहित पवार म्हणाले, “सामान्य जनतेला महागाईचा फटका बसायला नको या मताचा मी देखील आहे. यासाठी शेतकऱ्याचा बळी देणं चुकीचं ठरेल. केद्रानं पेट्रोल डिझेलवरील वाढवलेल्या करामुळं सध्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीत ऐतिहासिक वाढ झाली आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील करात थोडी जरी कपात केली तरी वाहतूक खर्च कमी होऊन व्यापारी वर्गासह सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.”

रोहित पवार म्हणाले, “कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण अर्थव्यवस्था बंद असताना शेतकऱ्यांनी कष्ट करून शेतात राब राब राबत कृषी अर्थव्यवस्था सुरू ठेवली. जनतेला भाजीपाला तसेच कृषी उत्पादनांची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळं आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांच्या प्रमाणे शेतकरी देखील कोरोना योद्धे आहेत. शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळला नसता तर उणे 23 टक्के घसरलेला जीडीपी उणे 30 टक्क्यांच्याही खाली गेला असता. किमान याची तरी केंद्र सरकारनं जाण ठेवायला हवी. दिवसरात्र एकत्र करून संपूर्ण कुटुंबासह शेतकरी शेतात राबतो, कष्ट करतो, उत्पादन घेतो. इतके कष्ट घेऊनही त्यांना मोबदला मिळत नाही. त्यांच्या हक्काचा पैसा हा इतर खर्चात जात आहे. कष्टांचा योग्य मोबदला मिळवण्याचा त्यांना अधिकार आहे. याचाही केंद्र सरकारनं विसर पडू देऊ नये.”

रोहित पवार असंही म्हणाले, “आज आपण कांदा निर्यात बंदी केली तर पाकिस्तानची कांदा निर्यात वाढेल. याचा फायदा पाकिस्तानातील कांदा उत्पादकांना होणार आहे याचाही केंद्र सरकारनं विचार करायला हवा.”