बाजारभावाचा निषेध करत शेतकऱ्याने कांद्याच्या ढिगाऱ्यात गाडून घेतलं

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – आधीच दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव मिळत नाही. कांद्याच्या लागवडीसाठी झालेला भरमसाट खर्च आणि बाजारात मिळालेला भाव यात शेतकऱ्याला नफा तर सोडाच पण प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. कांद्याला खूपच कमी भाव मिळत असल्याने निराश झालेल्या एका या शेतकऱ्याने स्वतःला कांद्याच्या ढिगाऱ्यात गाडून घेतलं आहे. मारुती मुंढे असे या शेतकऱ्याचे नाव असून ते नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपळखुटे गावचे रहिवाशी आहेत.

कांद्याला सध्या बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. कांदा विक्रीतून उत्पादनाचा खर्चही मिळत नसल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. मारुती मुंढे यांनी कांद्याला भाव मिळावा म्हणून आमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र केवळ उपोषणाला न बसताना त्यांनी स्वत:ला गळ्यापर्यंत कांद्याच्या ढिगात गाडून घेत उपोषण सुरु केले आहे.

काय आहेत मागण्या –

सरकारने कांद्याला हमीभाव द्यावा या तसेच शेतकऱ्यांचे २०१८ पर्यंतचे सर्व कर्ज माफ करावं. याचबरोबर २०१९ पर्यंत शेतकऱ्यांची सर्व वीज बिले माफ करण्यात यावीत. जोपर्यंत शासन आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मी हे आमरण उपोषण सुरु ठेवणार असल्याचे मारुती मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.