खुशखबर ! राज्यातील मोठया बाजारात कांद्याचा ठोक भाव 30 रूपये प्रतिकिलो, किरकोळ विक्री देखील स्वस्तात होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी असून कांद्याचे दर लवकरच कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आज गुरुवारी, महाराष्ट्रातील लासलगावमधील कांद्याच्या आशियातील सर्वात मोठ्या बाजारात कांद्याचे दर ३० रुपये प्रतिकिलोवर खाली आले. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी आणि व्यापाऱ्यांवर साठवण मर्यादा लागू केल्याने किंमतींवर मोठा परिणाम झाल्याचे आणि त्या नियंत्रणात आल्याचे दिसत आहे.

राष्ट्रीय बागायती संशोधन व विकास आस्थापना (NHRDF) च्या आकडेवारीनुसार सप्टेंबरच्या मध्यात नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या घाऊक बाजारात कांद्याचे दर प्रति किलो ५१ रुपये प्रतिकिलोच्या पातळीवर पोहोचले होते. महत्त्वाचे म्हणजे लासलगाव मंडईतून देशभरातील कांद्याचा भाव ठरण्याचा ट्रेन्ड सेट झाला आहे. या बाजारातील कोणत्याही चढ-उतारांचा देशाच्या इतर भागांवरील किंमतींवरही परिणाम होतो.

गुरुवारी लासलगाव कृषी उत्पन्न पणन समितीत कांद्याचे सरासरी घाऊक दर २६ रुपये प्रतिकिलो राहिला, यामध्ये जास्तीत जास्त किंमत ३०.२० रुपये आणि किमान किंमत १५ रुपये प्रतिकिलो होती.

ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. विशेषत: महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये ही वाढ होत आहे. याशिवाय खरीप हंगामात कांद्याच्या पिकाचे क्षेत्र कमी झाल्याने किंमतींवर दबाव वाढला आहे.

सरकारचे किंमत नियंत्रणासाठी प्रयत्न :
दिल्ली आणि एनसीआर मधील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना (NCCF) तसेच सरकारी मालकीची मदर डेअरी कांदा २३.९० रुपये प्रति किलो दराने विकत आहेत. केंद्राने आपल्या बफर स्टॉकमधून इतर राज्यांमधूनही कांदा घेण्याची ऑफर दिली आहे. गेल्या आठवड्यातच सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली तसेच व्यापाऱ्यांना साठवण मर्यादादेखील लागू केली.

किंमती ८० रुपयांवर पोहोचल्या :
गेल्या वर्षीच्या रब्बी पिकामध्ये साठवण झालेला कांदाच आतापर्यंत बाजारात विकला जात आहे. नोव्हेंबरपर्यंत खरीप पीक बाजारात येण्याची शक्यता आहे. कांदा हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील पीक असल्याने सरकारने देशांतर्गत बाजारात आपला पुरवठा कायम ठेवण्यासाठी सर्व पावले उचलली आहेत. अलीकडेच राजधानी दिल्ली आणि देशाच्या इतर भागात कांद्याचे दर ६०-८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले होते.

Visit : Policenama.com