कांद्याचा भाव वाढला ! मुंबईत कांदा 85 तर जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये 121 रुपये किलो

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यभरात सध्या कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. मुंबई बाजार समिती ( Mumbai Market Committee) मध्ये मंगळवारी ५० ते ८५ रुपये किलो दराने कांद्याची विक्री झाली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये हलक्या कांद्याला ४५ रुपये व चांगल्या कांद्याला तब्बल १२१ रुपये दर मिळाला आहे. सोलापूरमध्ये कांदा ( Onion) ५ रुपयांपासून १०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. कांद्याची आवक कमी झाली आहे तर मागणीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे कांद्याच्या दरात प्रतिदिन वाढ होत आहे.

राज्यभरातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी १९,३४६ टन कांद्याची आवक करण्यात आली होती. संपूर्ण राज्यात मंगळवारी कांद्याची फक्त १० हजार २२ टन इतकी आवक झाली आहे. यामुळे कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. मुंबई मधील एपीएमसी मार्केट ( APMC Market) मध्ये सोमवारी ४० ते ७० रुपये किलो दराने कांदा विकला जात होता. मंगळवारी हे दर ५० ते ८५ रुपये एवढे झाले होते. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ७० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकण्यात येत आहे. आवक वाढली नाही तर दसऱ्यापर्यंत कांदा शंभरीपार जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात कांद्याला सर्वात जास्त दर जुन्नर आळेफाटा बाजार समिती( Junnar Alephata Market Committee) मध्ये मिळाला आहे. मंगळवारी येथे हलक्या दर्जाचा कांदा ४५ रुपये किलो व चांगल्या दर्जाचा कांदा १२१ रुपये किलो दराने विकला गेला आहे. हा राज्यातील सगळ्यात विक्रमी दर आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी ५ रुपये व जास्तीत जास्त १०० रुपये किलो दराने कांद्याची विक्री करण्यात आली आहे. अहमदनगरमधील राहता बाजार समितीमध्येही कांदा २० ते १०५ रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला आहे.

राज्यातील बाजार समितीतील दर
मुंबई – ५० ते ८५
जुन्नर आळेफाटा – ४५ ते १२१
सोलापूर – ५ ते १००
कोल्हापूर – २५ ते ८०
पुणे – २० ते ८२
नागपूर – ४० ते ५५
नाशिक – ३२ ते ७०
लासलगाव – २० ते ७७
राहता – २० ते १०५