5 दिवसात कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 650 रूपयाची ‘घसरण’

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम जसा जनजीवनावर होताना दिसत आहे तसाच तो अर्थव्यवस्था आणि बाजार पेठेवरही होताना दिसत आहे. कोरोनाच्या भीतीचे सावट आता बाजार समित्यांवर देखील होत आहे. राज्यात कोरोना भीती मुळे कांद्याचे दर घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. कांदा निर्यातबंदी खुली झाल्यानंतर कांदा बाजारात सुधारणा होण्याचे आशादायी चित्र निर्माण झाले होते. लासलगाव बाजार समिती मध्ये वाढलेली आवक तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली निर्यातही मंदावल्याने सलग दुसऱ्या दिवशी कांदा दरात २०० रुपयांची घसरण दिसून आली.

कांदा निर्यात खुली करण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनं केली. त्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली केली. रविवार (ता.15) पासून कांद्याची निर्यात बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, दुबई आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये सुरु झाली. मात्र (१२मार्च) तुलनेत लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात ६५० रुपये प्रति क्विंटल घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कांदा निर्यातबंदी मागे घेतल्याची घोषणा व त्यात साठवणूक मर्यादा मागे घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी निर्यातीची तयारी करून मालाची लोडिंग केली जवळपास ७ हजार मॅट्रिक टन कांदा निर्याती साठी रवाना करण्यात आला मात्र कोरोनाचा धसक्याने निर्यात होणाऱ्या महत्त्वाच्या देशांतुन मागणी कमी झाल्याने निर्यातीवर गदा आली आहे याचाच परिणाम बाजार घसरण्यावर झाला असून पाठवलेला माल उतरविला जाईल की नाही, अशी भीती व्यापाऱ्यांच्या मनात असून, यामुळेच काही प्रमाणात निर्यात रोडावली आहे.

कांद्यावरील निर्यातबंदी उठणार असल्याने मोठ्या अपेक्षेने कांदा उत्पादक बाजारात आणल्याने आवक वाढत गेली. त्यात थोड्या फार प्रमाणात उन्हाळ कांद्याची आवक होऊ लागल्याने आवकेत वाढ होत आहे. लासलगाव बाजार समितीत बुधवारी (ता.१८) लाल कांद्याला कमीत कमी ८०० सरासरी ११०० तर जास्तीत जास्त १३१५ रुपये भाव होते, उन्हाळ कांद्याला कमीत कमी १००० सरासरी १२०० तर जास्तीत जास्त १४७६ रुपये भाव होते