मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे दर झाले कमी : आडते असो. चे अध्यक्ष विलास भुजबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने वाढलेला कांद्याचा दर काही अंशी कमी झाला आहे. बाहेरील राज्यातून आवक वाढल्याने आणि शेतकऱ्यांनी नवीन कांदा बाजारात आणल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे दर कमी झाले आहेत. आज मार्केटयार्ड येथील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये कांद्याचे दर किलोमागे 60 तें 120 रुपयांपर्यंत होता, अशी माहिती आडते असोसिएशन चे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

यावर्षी पाऊस अधिक झाल्याने कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. पावसात कांद्याची रोपेही वाहून गेल्याने लागवडीवरही परिणाम झाला आहे. त्याचवेळी उन्हाळी कांद्याचा साठाही संपत आल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. मागील आठवड्यात जुन्या कांद्याचा भाव घाऊक बाजारात 120 रुपये तर किरकोळ बाजारात 150 रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. बाजारात पुरेसा कांदा नसल्याने नवीन कांद्याचे दर ही 100 रुपये किलोच्या पुढे होते.

तुलनेने या आठवड्यात मात्र कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर कमी झाले आहेत. शेतकऱ्यांनी दर मिळत असल्याने आहे त्या परिस्थितीत कांदा बाजारात आणला आहे. आज गुरजरत मधून 100 टन, पुणे विभागातून 90 ते 100 ट्रक नवीन कांदा तर 10 ते 12 ट्रक जुना कांदा विक्रीसाठी आला. नवीन कांदा 600 ते 1000 हजार रुपये 10 किलो तर जुना कांदा 1000 ते 1300 रुपये दहा किलो असा दर मिळाला, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

Visit : Policenama.com