कांद्याचे दर कोसळले ! 2 दिवसांत बाजारभावात 1351 रुपयांची घसरण

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऐन सणासुदीच्या तोंडावर कांदा बाजारभाव दोन दिवसांत तब्बल १३५१ रुपयांनी घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. सोमवारी सरासरी ४६५१ रुपये प्रतिक्विंंटलने विक्री झालेला कांदा आज सरासरी ३३०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाला. शेतकऱ्यांना दोन दिवसांत तब्बल १३५१ रुपये प्रतिक्विंटलचा फटका बसला आहे.

गुरुवार (१२ नोव्हेंबर)पासून लासलगाव बाजार समितीला दीपावलीनिमित्त आठ दिवस सुट्ट्या असल्याने बाजार समितीत कांदा आवक वाढलेली आहे. १२ सप्टेंबरनंतर प्रथमच येथील मुख्य बाजार आवारावर मंगळवारी बारा हजार क्विंटलचा पुढे कांदा लिलावासाठी आला होता.परदेशी आयात केलेला कांदा ,वाढती उन्हाळ कांदा तसेच नवीन लाल कांद्याची आवक यामुळे लासलगाव बाजार समितीत दोन दिवसांत १३५१ रुपयांनी कांदा गडगडल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने कुटुंब कसे चालवावे आणि झालेला खर्च कसा काढावा, असा प्रश्न आता कांदा उत्पादकांसमोर उभा राहिला आहे. वेगवेगळ्या निर्बंधांमुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

सकाळच्या सत्रात येथील बाजार समितीत ४९० वाहनांतून ७५०० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्याला कमाल ४४७१ रुपये ,सर्वसाधारण ३३०० रुपये तर किमान १२०० रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजारभाव जाहित झाला, तर लाल कांद्याला किमान १०००, सरासरी २२०० तर जास्तीत जास्त ३९०० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला.