क्रिकेट सामन्यावर बोटिंग घेणाऱ्याला लोणावळ्यात अटक

लोणावळा (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या मुंबई येथील एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तर सट्टा लावणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यापैकी तीन जणांचा शोध घेऊन अटक केली आहे. ही कारवाई पथकाने लोणावळा येथील हॉटेल रॉयल दरबार येथे गुरुवारी (दि.२४) केली.

भाविन सामजी आनम (वय ३८, रा. मुळेबाई चाळ, गोसला रोड, मुलुंड वेस्ट, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर दया भानुशाली (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), चेतन प्रभुदास झाला (वय ४६, रा. सेक्टर २०, खारघर, नवी मुंबई), निरव रमानी (रा. मुलुंड), मॉन्टू जैन (रा. मुलुंड), शशी गुलाब आजवानी (रा. कुमुदनी बिल्डिंग, दिव्यदयाल रोड, मुलुंड वेस्ट, मुंबई), सुनील महेंद्र जैस्वाल (रा. आयसीसी क्लब जवळ, मीरा रोड, ठाणे) यांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा येथील रॉयल दरबार मधील एका खोलीत मुंबई येथील एक व्यक्ती क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरु यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करुन पोलिसांनी हॉटलमध्ये छापा टाकून भाविन आमन याला ताब्यात घेतले. या करावाईत त्याच्याकडून दोन मोबाईल फोन, एक रजिस्टर असा एकूण १४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

आरोपीकडे ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या सहा जणाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक जिवन राजगुरु, महेश मुंडे,सहायक फौजदार विजय पाटील, सुनिल बांदल, दिलीप जाधवर, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वाघमारे, मोरेश्‍वर इनामदार, दयांनद लिमण, पोलीस नाईक गणेश महाडीक, चंद्रकांत जाधव, ज्ञानदेव क्षीरसागर, विशाल साळुंखे, अक्षय नवले यांच्या पथकाने केली.