भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकून इतिहास रचला !

पोलिसनामा ऑनलाईन – जागतिक ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत भारताने काल इतिहास रचला आहे. ऑनलाईन पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरले आहे. मात्र भारत आणि रशियाला संयुक्त विजेता म्हणून घोषित करण्यात आले. रशियाविरुद्ध खेळवण्यात आलेला अंतिम सामना इंटरनेट कनेक्शनमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी भारत आणि रशियाला संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात आले. नाशिकच्या विदित गुजराथी या युवा बुद्धिबळपटूने भारतीय संघाचे नेतृत्त्व केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने सामने आयोजत केले होते. यावेळी भारतीय संघात कर्णधार विदित गुजराथी, माजी चॅम्पियन विश्वनाथन आनंद, कोनेरु हम्पी, डी हरिका, आर प्राग्गनानंद, पी हरिकृष्णा, निहाल सरीन आणिर दिव्या देशमुख यांनी अंतिम सामन्यात रशियाविरुद्ध भारताचे प्रतिनिधित्त्व केले. सुरुवातीला रशियाला विजेता म्हणून घोषित करण्यात आले होते. कारण अंतिम सामन्यात भारताच्या निहाल सरीन आणि दिव्या देशमुख हे इंटरनेट कनेक्शनमधील तांत्रिक अडचणींमुळे सर्व्हरसोबत कनेक्ट झाले नाही, परिणामी त्यांचा वेळ वाया गेला. भारताने या वादग्रस्त निर्णयाचा विरोध केल्यानंतर पडताळणी करण्यात आली. जागतिक स्तरावर इंटरनेटमध्ये अडचणी असल्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये त्याचा परिणाम दिसत आहे. भारताचे दोन खेळाडूंना याचा फटका बसला आणि त्यांचे कनेक्शन गेले. त्यामुळे सामन्याचा निकाल आला नाही. जागतिक ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तपणे का होईना भारताला पहिल्यांदाच विजेतेपद मिळाल्याने भारतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.