ई-तिकीट रॅकेट : महिन्याला 15 कोटींची उलाढाल करत होता ‘हा’, क्रिप्टोकरन्सीनं परदेशात पाठवत ‘पैसे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) ने रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणून झारखंड येथील राहणाऱ्या गुलाम मुस्तफाला ओडिसा येथे अटक केली आहे. त्याच्यासोबतच अन्य २७ लोकांना देखील पकडण्यात आले आहे. हे लोक रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करून दर महिन्याला कोट्यावधी रुपयांची कमाई करायचे आणि तो पैसा दहशतवादी निधीसाठी वापरला जात असे.

१५ कोटी रुपयांच्या तिकिटांचा केला काळा बाजार
झारखंडच्या गिरीडीह येथील रहिवासी गुलाम मुस्तफा बेंगळुरूमध्ये ई-तिकिट घोटाळा करणारी टोळी चालवत होता. आयआरसीटीसीची यंत्रणा हॅक करून संपूर्ण देशात दरमहा १५ कोटी रुपयांच्या रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केला जात होता. लॅपटॉप आणि जवळील मोबाइल फोनवरून मिळालेल्या माहितीने आरपीएफसह बंगळुरू पोलिसांना आश्चर्यचकित केले आहे. त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल पूर्णपणे इन्क्रिप्टेड होता.

याचे शिक्षण ओडिसामधील केंद्रपाडाच्या मदरसो येथे झाले. नंतर तो बेंगळुरूला गेला जिथे २०१५ मध्ये रेल्वे काऊंटर तिकिटांच्या दलालीची सुरूवात केली. मग सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण घेतले आणि नंतर ई-तिकीटाच्या काळ्या बाजारात सामील झाला. पाकिस्तानमधील बर्‍याच संघटनांशी त्याचा संपर्क असू शकतो, हे या लॅपटॉपवरून दिसून आले आहे. गुलाम मुस्तफा याच्यासमवेत बरेच सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत आणि त्यांच्या खाली २०० ते ३०० लोकांचे पॅनेल २८,००० रुपये महिन्यावर काम करते. हे लोक देशभरातील २०,००० तिकिट एजंटांशी संपर्कात असतात.

एका मिनिटात ३ तिकिट बुक करायचा
या टोळीत ‘गुरुजी’ नावाची एक व्यक्तीही सहभागी आहे. तसे त्याचे मूळ नाव वेगळे आहे पण तो या टोळीसाठी रेल्वेचे तिकिट बुकिंग सॉफ्टवेअरमध्ये घुसखोरी करतो. जिथे तिकिट बुकिंगच्या संपूर्ण प्रक्रियेस ३ मिनिट लागतात, तेथे गुरुजी असा प्रोग्रॅम तयार करतो की एका मिनिटात तीन तिकिट बुकिंग होतात.

क्रिप्टोकरन्सीद्वारे परदेशात पाठवायचा पैसे
या काळ्या धंद्यातून मिळणार्‍या उत्पन्नाची भारतातील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये बर्‍याच वेळा गुंतवणूकही केली गेली आहे. या कंपनीवर आधीपासूनच सिंगापूरमध्ये एक फौजदारी खटला नोंदविला गेला असून त्याबाबतचा तपास चालू आहे. ही टोळी भारतातून परदेशातही पैसे पाठवत होती. त्याचबरोबर, बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीद्वारे देखील विदेशात पैसे पाठविले आहेत. या रकमेचा वापर टेरर फंडिंगसाठी होत असून या माहितीने सुरक्षा यंत्रणांची झोप उडविली आहे. मुस्तफा गेल्या १० दिवसांपासून बेंगळुरूच्या न्यायालयीन कोठडीत होता आता त्याला पोलिस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. आतापर्यंतच्या तपासातून आरपीएफचा अंदाज आहे की दरमहा सुमारे १०-१५ कोटींची कमाई वेगवेगळ्या मार्गाने देशाबाहेर पाठविली जात होती.

फेसबुक पेज लाईक करा –