‘या’ नव्या पद्धतीने हॅकरने लुबाडले बॅंकेतील 1.5 लाख रुपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईल बॅकिंगसाठी बँकेकडून मोबाईल व ई-मेलवर पासवर्ड आला असताना मोबाईल नंबर हॅक करुन हॅकरने बँक खात्यातील तब्बल दीड लाख रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याचा नवाच प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी संजय शाम देव (वय ५३, रा. आयसीएस कॉलनी, भोसलेनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० आक्टोंबर २०१८ रोजी घडला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, संजय देव यांचे पिंपरीतील आंध्रा बँकेच्या पिंपरी शाखेत बचत खाते आहे. त्यांच्या खात्याची मोबाईल बॅकिंग पासवर्डची मुदत संपल्यामुळे त्यांनी या खात्याचा नवीन पासवर्ड मिळण्यासाठी बँकेकडे अर्ज केला होता. त्यावरुन देव यांच्या मोबाईलमध्ये बँकेकडून मोबाईल व ई-मेलवर पासवर्ड पाठविण्यात आला होता. देव यांनी मोबाईलवरुन बँकिंग अ‍ॅपवरुन लॉग ईन केला असता हॅकरने त्यांचा मोबाईल नंबर हॅक केला. त्यानंतर त्याने देव यांच्या आंध्रा बॅकेच्या पिंपरी शाखेतील खात्यामधून ४ वेळा ट्रान्झेक्शन करुन १ लाख ४३ हजार २० रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे अर्ज दिला होता. या अर्जावरुन आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.