Pune News : तेलंगणा पोलिसांची पुण्यात मोठी कारवाई, ऑनलाईन कर्जाच्या बहाण्याने फसवणूक करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   ऑनलाईन कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा तेलंगणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तेलंगणा पोलिसांनी पुण्यात येऊन या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. तेलंगणा पोलिसांनी कोरेगाव पार्कमधून या टोळीला अटक केली आहे. कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी एका चिनी महिलेसह तिघांना अटक केली. ही कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.

तेलंगणा पोलिसांनी केलेल्या कारवाईत 100 हून अधिक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले आहेत. याशिवाय अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्याची पाहणी केली असता. त्यांच्या खात्यात लाखो रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हैदराबाद आणि तेलंगणामध्ये ऑनलाईन कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. यामुळे संबंधित कंपन्या पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत. ऑनलाइन कर्ज देण्यासंदर्भातील प्रक्रिया पुण्यातील एका कॉल सेंटरमधून सुरु असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे तेलंगणा पोलिसांचे एक पथक पुण्यात दाखल झाले. त्यांनी कॉल सेंटरचा शोध घेतला. पोलिसांनी कोरेगाव पार्क पोलिसांच्या मदतीने शनिवारी कॉल सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत 100 लॅपटॉप, कागदपत्रे, मोबाईल जप्त करण्यात आली आहेत. तसेच एका चिनी महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे.